शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

आता परत चौथी व सातवीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा होणार.... वाचा सविस्तर 👇👇

Scholarship Exam 2025 Changes: परीक्षा वेळापत्रक आणि आयोजन (Revised Exam Schedule & Implementation)
🕒 २०२५-२६ मध्ये विशेष बाब:
इ.५ वी व ८ वी परीक्षा: फेब्रुवारी २०२६ च्या २ऱ्या किंवा ३ऱ्या रविवारी
इ.४ थी व ७ वी परीक्षा: एप्रिल किंवा मे २०२६ मधील कोणताही रविवार
📅 २०२६-२७ पासून नियमित परीक्षा:
दरवर्षी फेब्रुवारीच्या २ऱ्या/३ऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येईल.
📍 आयोजक संस्था: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
💰 3. वाढलेली शिष्यवृत्ती रक्कम आणि कालावधी (Increased Scholarship Amount & Duration)
💸 रक्कम:
इ.४ थी स्तर: ₹500/महिना (₹5000/वर्ष)
इ.७ वी स्तर: ₹750/महिना (₹7500/वर्ष)
कालावधी: ३ वर्षे
🏦 वितरण: विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यातून थेट जमा.
📊 मंजूर संच संख्या:
इ.४ थी / ५ वी: १६,६९३
इ.७ वी / ८ वी: १६,५८८
🧾 4. पात्रता निकष (Eligibility Criteria)
✅ निवास: महाराष्ट्रातील रहिवासी
✅ शिक्षण: शासनमान्य शाळेत इ.४ थी किंवा ७ वी शिकत असलेला विद्यार्थी
वयमर्यादा (१ जून रोजी):
इ.४ थी: १० वर्षे (दिव्यांग: १४ वर्षे)
इ.७ वी: १३ वर्षे (दिव्यांग: १७ वर्षे)
किमान गुण: प्रत्येक पेपरमध्ये ४०% गुण आवश्यक.

📚 5. परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम (Exam Format & Syllabus)
🗒️ माध्यमे: मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू
📖 अभ्यासक्रम:
इ.४ थी स्तर – इ.१ ली ते ४ थी
इ.७ वी स्तर – इ.१ ली ते ७ वी
🧠 प्रश्न स्वरूप: वस्तुनिष्ठ (MCQ), ४ पर्यायांपैकी १ योग्य
🎯 काठिण्य पातळी: कठीण (३०%), मध्यम (४०%), सोपे (३०%)
✏️ पेपर रचना:
पेपर १: प्रथम भाषा (५० गुण) + गणित (१०० गुण)
पेपर २: तृतीय भाषा (५० गुण) + बुद्धिमत्ता चाचणी (१०० गुण)

 संकलन - श्री रफिक सुतार सर 
 आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर 

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५

आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर च्या वेबसाईट चे उदघाटन

*आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगरच्या शाळा वेबसाईटचे उद्घाटन उत्साहात संपन्न* 
*डिजिटल युगात वेबसाईट हीच यशाची गुरुकिल्ली -डॉ.सौ.स्वाती थोरात* 
   श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशु विहार आगाशिवनगर च्या शाळा वेबसाईट चे उद्घाटन संस्थेच्या संचालिका- डॉ.सौ. स्वाती थोरात यांच्या शुभहस्ते ,पालक प्रतिनिधी.श्री श्रीकांत नरूले, श्री अतुल काकडे ,श्री.तानाजी शिंदे,श्री.निखिल केसकर,श्री विजय हजारे ,श्री संदीप गायकवाड ,श्री.सचिन मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक- सचिन शिंदे ,श्रीमती लता नलवडे, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न.
      सध्याच्या संगणकयुगात शैक्षणिक प्रगती व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीसाठी डिजिटल युगात वेबसाईट हीच यशाची गुरुकिल्ली आहे .असे मत संस्थेच्या संचालिका- डॉ.सौ.स्वाती थोरात मॅडम यांनी व्यक्त केले.
       विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे ,आनंददायी शिक्षणाचे आदर्श संस्कार मंदिर अशी ख्याती असणारे आदर्श ज्ञानसंकुलन आता एका क्लिक वरती उपलब्ध होत असून संस्थेचे सचिव- मा.अशोकराव थोरात (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली संधी. ही नक्कीच नवनवीन शैक्षणिक क्षितिजे पादाक्रांत करण्यास सहाय्यभूत ठरेल. असा विश्वास विद्यालयाचे मुख्याध्यापक- श्री सचिन शिंदे यांनी व्यक्त केला.
       यावेळी सौ.अर्पिता बाबर सौ.स्वप्नाली भिलारे, सौ.शुभांगी तोडकर,सौ.साक्षी मोरे,सौ. दिपाली तांबे, सौ. ऐश्वर्या शेवाळे सौ.विशाखा पवार ,सौ.दिपाली खबाले, सौ.रविना कुंभार ,सौ. स्वाती हावळ,सौ.रुपाली चौगुले,सौ जोत्स्ना जगदाळे, सौ.प्रियांका देशमुख,सौ.सविता भाष्टे, सौ.अनिता कुंभार आधी पालक व विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोपान जगताप यांनी केले.तर आभार श्री.रफिक सुतार यांनी मानले.

@आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा@

*@ १५ ऑक्टोबर @*
*वाचन प्रेरणा दिन*

१५ आॕक्टोबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते. आदरणीय कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत. पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आपण 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करीत आहोत. आपण शैक्षणिक जीवनात सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहूनही अंतिमत: अवांतर वाचनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे म्हटले जाते. वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.

'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे. वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.

हा संस्कार जितक्या लहान वयापासून केला जाईल तितके आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनत जाते. कारण या वाचनामुळे लहान मुलांमधील आकलन क्षमता वाढते. गोष्टींच्या पुस्तकातील कोणत्याही कथेला सुरवात, मध्य आणि शेवट असतोच. कथेच्या या रचनेमुळे लहान मुलांच्या मेंदूला चालना मिळते. ते विचार करायला सुरवात करतात, कारणांशी संबंध जोडतात, तार्किक विचार करीत मनातल्या मनात कथेचा शेवटही योजून ठेवतात. एखादी गोष्ट अवगत करणे ही लहान मुलांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदूची जडणघडण होते. वाचनाने विचार क्षमता वाढीस लागण्याचे हे मूळ कारण आहे. वाचन आपल्या मेंदूसाठी व्यायामाचे काम करते. विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात 'वाचन संस्कार' व्हावेत, यांच्या ठायी समृद्ध अशी अभिरुची, उच्च दर्जाची रसिकता आणि संवेदनशीलता हे मूल्य रूजविण्याच्या हेतूने या 'वाचन प्रेरणा दिनाचे' महत्व आणखीनच वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यां मध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले गेले पाहिजेत.

महत्वाचे म्हणजे वाचनाच्या वेगाची संकल्पना प्रत्येकाला असायली हवी. एका नजरेच्या टप्प्यात पुस्तकाचा जास्तीत जास्त भाग यायला हवा, तसा सरावही हवा. भारतीय लोकांचा सरासरी वाचनाचा वेग हा जपानी लोकांच्या सरासरी वाचनाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे हे खेदाने का होईना, आम्ही कबूल करतो. कमी कालावधीत जास्तीत जास्त आकलनासह वाचन हे खरे वाचन कौशल्य. नुसता एकच दिवस 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करुन थांबण्यापेक्षा, रोजच जर पुढील उपक्रमांद्वारे वाचन प्रेरणा राबविली तर वाचन प्रेरणा दिनाचे रुपांतरण वाचन चळवळीत होईल, यांत शंका नाही. या साठी केवळ शाळेतच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, घर परिसर, घर या पातळ्यांवर वाचनालय, पुस्तक पेढी, पुस्तक भेट योजना, पुस्तक दान योजना, वाचन प्रेरणा विषयक व्याख्याने यांचे वेळोवेळी वा कायमचे आयोजन/नियोजन आवश्यक आहे. या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य लक्षात घेवून आम्हाला आज वाचन या क्रियेसंदर्भात आणखी वेगळे काही सांगावयाचे आहे. 'वाचन' हा शब्द आला की, आपण फक्त 'पुस्तकी वाचन' एवढाच मर्यादित अर्थ घेतो. आमच्या मते वाचनाचा अर्थ इतका सिमित नाही. आपली पंचेद्रिये आणि मन ही खरी वाचनाची माध्यमे आहेत, त्यांचा वापर करता यायला हवा. डोळ्यांना जे जे दिसतं ते ते वाचता यायला हवं. मग वस्तु दिसो वा व्यक्ती किंवा घडणारा प्रसंग असो, डोळ्यांनी वाचायला हवं.

नाकाला जाणवणारा गंध वाचता यायला हवा!
कानांनी आवाज वाचता यावा असा सराव हवा!
त्वचेलाही होणारा प्रत्येक स्पर्श वाचता यायला हवा! 
स्पर्शवाचनातून स्पर्शाचा अर्थ कळायला हवा!
निदान वेळेवर सावध तरी होता येते!
जीभेलाही चव वाचता यायला हवी!
पंचेद्रियांच्या वाचनासाठी मनात संवेदना जागृत व्हायलाच हवी. आणि सर्वांत महत्वाचे की, आपल्याला आपल्या मनाद्वारे दुसऱ्यांचे (किमान आपल्या घरातल्या व्यक्तींचे अथवा मित्र मैत्रीणींचे तरी) मन वाचता यायला हवे. दुसऱ्यांचे मन वाचता येणे हे उच्च कोटीच्या संवेदन शीलतेचे लक्षण आहे. अशा संवेदनशीलतेनेच मानवता जागृत होते हे ही लक्षात घ्यायलाच हवे. थोडक्यात काय, तर आपल्या सर्वच संवेदनांचे परिपूर्ण वाचन प्रत्येकाला करता येणे आवश्यकच आहे.

*वाचाल तरच वाचाल*
'वाचाल तर वाचाल' हे ब्रीद मानू या धन,
वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन;
वाचाव्यात संवेदनाही, या जागृत पंचेद्रियांनी,
पुस्तकाच्या वाचनासवे, करावे मनाचे वाचन !
प्रत्येक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर, संवेदनशील, रसिक व कलावंत होण्यासाठी प्रत्येक शाळेने वाचन प्रेरणेचे कार्यक्रम घेऊन येणारी पिढी समृद्ध व्यक्तिमत्त्वाची घडवावी हेच 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करतांना अपेक्षित आहे. पुस्तकी वाचनासोबत आपण एखाद्याच्या 'मनाचे' ही वाचन करावे ही सर्वांना नम्र विनंती करुन, आम्ही आपला निरोप घेतो.

संकलन :- श्री रफिक सुतार 
आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर

रविवार, १४ सप्टेंबर, २०२५

श्री मळाई महिला विकास मंच आयोजित, - महिला मेळावा उत्साहात साजरा.

५५वा महिला मेळावा मलकापूर येथे  महिलांच्या उस्फुर्त सहभागाने संपन्न.
     मलकापूर मध्ये अवतरल्या  गौराई..
मलकापूर-
     श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी व श्री मळाई महिला विकास मंच मलकापूर यांचे संयुक्त विदयमाने मलकापूर, आगाशिवनगर पंचक्रोशीतील महिलांसाठी घेण्यात आलेला महिला मेळावा शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात व महिलांच्या उस्फुर्त सहभागाने पार पडला. प्रमुख पाहुण्या  हेल्दी  मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख योगशिक्षिका मा. सौ. स्मिता हिम्मत वेल्हाळ,  कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपनिबंधक सहकारी संस्था कराडच्या मा. श्रीमती अपर्णा यादव, मा. सौ.शालिनीताई थोरात (काकी), श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माजी व्हाइस चेअरमन मा. सौ. अरुणादेवी पाटील श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्याक्षा डॉ. सौ. स्वाती रणजीत थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला.
         कार्यक्रमाच्या पाहुण्या मा. सौ. स्मिता वेल्हाळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
       प्रास्ताविकपर भाषणात श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ. स्वाती थोरात यांनी महिला मेळावा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करीत मळाई महिला विकास मंच नेहमीच महिला मेळाव्याचे आयोजन करून महिलाच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारच तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.सुखाचे सण म्हणजेच मंगळागौर होय. या संस्कृतीचे आपणांस जतन करायचे आहे. यावेळी पिंगळ्याच्या गाण्यातून विरोधाभास वाटत असला तरी त्यामधून नात्यांची  जपणूक कशी करावी हे सांगितले आहे असे मत व्यक्त केले.
     यावेळी हेल्दी मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख मा. सौ. स्मिता वेल्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली मंगळागौर कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमधील शिक्षिका महिला पालक यांनी वेगवेगळे गीतांवर उत्कृष्ट नृत्य सादर करून कार्यक्रमांमध्ये बहार आणली. यामध्ये गणेश वंदनापासून ते गौरी गणपतीच्या विविध  गाण्यांवर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी मळा ई महिला विकास मंचच्या वतीने सहभागी महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
           या महिला मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व शाळेतील शिक्षिका, महिला पालक वर्ग यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन या महिला मिळवणारे खऱ्या अर्थाने  कोणत्याही क्षेत्रात कमी नसतात हे या निमित्ताने अधोरेखित केले. तसेच महिलांच्या कर्तृत्वाला कोणतेही प्रकारचे सीमा नसते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे  घराला घरपण देणारी महिला अर्थात गृहिणी ते आपले आवडते छंद तितक्याच ताकदीने जोपसणारी कलारसिक, कलाउपासक असा तिचा कल  असेच काही चित्र या महिला मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आले.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.शीला पाटील,  प्रा. सौ. सुरेखा खंडागळे यांनी केले तर आभार माजी व्हाईस चेअरमन मा.सौ अरुणादेवी पाटील यांनी मानले. 
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मळाई महिला विकास मंचच्या सर्व सदस्या, सर्व शिक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या विकासासाठी व त्यांच्यातील सुप्त  कलागुणांना वाव देण्यासाठी श्री
 मळाई महिला विकास मंचने आयोजित केलेल्या या महिला मेळाव्याचे महिला पालक वर्गामध्ये विशेष कौतुक होत आहे..

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

आदर्श ज्ञानसंकुलात 'विद्यार्थी शिक्षक दिन साजरा..





*आदर्श ज्ञानसंकुलनात‌ शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी -पालक स्वयंशासन दिन उत्साहात साजरा* 
     गुरुविना ना मिळे ज्ञान ज्ञानाविना ना जगी सन्मान या उक्तीप्रत विद्यार्थ्यांना शिक्षण आणि शिक्षकांची महती प्रत्यक्ष अनुभवता यावी.अध्ययन- अध्यापन,शालेय प्रशासन यांविषयी अनुभव घेता यावा यासाठी ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून शिक्षक दिनी आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशु विहार आगाशिवनगरमध्ये विद्यार्थी- पालक स्वयंशासन दिनाचे आयोजन करण्यात आले.
     शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शिक्षक हेच सक्षम व संस्कारक्षम नवभारताचे भाग्यविधाते आहेत.आजच्या विद्यार्थी केंद्रितअध्ययन-अध्यापन शास्त्रातील सर्व बारकावे विद्यार्थ्यांना जवळून पाहता यावेत.यासाठी विद्यालयात आयोजित केलेल्या स्वयंशासन दिनामध्येअभिरूप मुख्याध्यापक -अनय बोधे ,अभिरूप उपमुख्याध्यापिका- अनघा काकडे ,लेखनिक -गौरव शेलार ,कु.समीक्षा मोहने,परिचर म्हणून - इंद्रजित भिसे ,आरव कांबळे ,राजवीर घोरपडे यांनी संपूर्ण दिवस शालेय प्रशासन शिस्तबद्धरीत्या चालवले.अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारून विविध घटकांचे अध्यापन करून कला ,क्रीडा, साहित्य ,खेळ,प्रयोग प्रात्यक्षिकांच्या तासिका घेऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले. 
        दुपार सत्रामध्ये ,स्वयंशासन दिनाचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी सौ सविता भाष्टे,सौ उर्मिला साबळे ,सौ लक्ष्मी कणसे सौ स्नेहल घारे सौ. कोमल पाटील ,सौ अनिता कुंभार,सौ वैशाली जाधव,सौ.आरती देशमुख, सौ. विद्याश्री शेतमंदी,सौ. स्नेहल घारे ,श्री.दिगंबर सुतार ,श्री.श्रीकांत नरूले,श्री.तानाजी शिंदे,श्री.महेश मगरे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक-श्री. सचिन शिंदे, आदर्श शिशु विहारच्या मुख्याध्यापिका श्रीमती-लता नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतरअभिरूप शिक्षक-शिक्षिका,अभिरूप मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले.यावेळी मा.रफिक सुतार ,मा. वैभव शिर्के ,मा.सोपान जगताप ,सौ.रुपाली कुंभार, सौ.प्राजक्ता पाटील ,सौ.अश्विनी पाटील,सौ.रंजना कांबळे,सौ.नंदा पानवळ, सौ.शबाना मुल्ला, सौ.सायराबानू नदाफ ,सौ.वनिता कुंभार ,कु.आकांक्षा झुमूर ,सौ.शितल भिसे,सौ.मेघा भाटे ,सौ.शोभा मोरे ,सौ.दिपाली रेठरेकर सौ.वैशाली शिंदे, श्री.संग्राम काकडे यांचेसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. अनघा काकडे हिने केले तर गौरव शेलार याने आभार मानले. अशाप्रकारे स्वयंशासन दिनमोठ्या उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
     संस्थेचे सचिव मा. अशोकराव थोरात (भाऊ) .अध्यक्ष मा.पांडुरंग पाटील ,उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील ,खनिजदार- मा.तुळशीराम शिर्के ,संचालिका डॉ. स्वाती थोरात व संचालक-मा.वसंतराव चव्हाण यांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

श्री मळाईदेवी शिक्षण संस्था - शिक्षक दिन

श्री मळाईदेवी शिक्षण संस्था - शिक्षक दिन 


भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती, थोर विचारवंत, ज्ञानाचा दीप लावून अज्ञानाचा अंध:कार दूर करणारे संस्काराची शिदोरी देणारे व यशस्वी जीवनाचा मार्ग दाखविणारे समाजाला योग्य दिशा दाखवणारे शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन व सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणास्थान असलेल्या गुरुजनांचा सत्कार समारंभ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् जयंती शिक्षक दिन समारंभ गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी आदर्श जुनिअर कॉलेज मलकापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शेती मित्र अशोकराव थोरात यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची सर्व उपस्थित शिक्षक बांधवांना माहिती करून दिली. शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांनी सातत्याने वाचन करावे तसेच शिक्षकांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाज प्रबोधन करावे असे शिक्षकांना त्यांनी आवाहन केले. तसेच शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील कर्तुत्वाचे दाखले देत शिक्षकांनीही त्यांच्या विचारांचा वारसा पुढे तेवत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य अखंडितपणे सुरू ठेवावे असे यावेळी आवाहन केले.
         यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहूणे डॉ. राजेंद्र कंटक यांचे शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्तिथीत करण्यात आले.
         यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र कंटक, प्रमुख पाहुणे चेअरमन श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी मा.अजित थोरात, संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. सौ. स्वाती थोरात, संस्थेचे अध्यक्ष मा. पांडुरंग पाटील, उपाध्यक्ष मा.भास्करराव पाटील, खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,संचालक वसंतराव चव्हाण, संचालक मा.प्रा. संजय थोरात,सौ शालिनीताई थोरात, मारुती सुझुकीच्या मा. सेजल अग्रवाल तसेच व्हा.चेअरमन मा. चंद्रकांत टंकसाळे, माजी व्हाईस चेअरमन सौ.अरुणादेवी पाटील विद्यमान संचालिका सौ.उज्वला पाटील, शाखाप्रमुख मा. सर्जेराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
         प्रास्ताविकपर भाषणात डॉ.सौ. स्वाती थोरात यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे वर्णन केले. शिक्षक समाज घडवतो, परिवर्तन घडवतो, चारित्र्य घडवण्यासाठी ज्ञान देतो.समाजाची घडी बसवायची असेल तर शाळा एक हे एकच माध्यम आहे. व्यक्तिमत्व घडवण्याचे,समाज उभारण्याचे काम शिक्षकच करतो.राष्ट्र घडवण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे ते आपण यंत्रमानवावर सोपवू शकत नाही असे मत सद्यस्थितीतील येऊ घातलेल्या शिक्षण क्षेत्रातील एआय तंत्रज्ञानाविषयी आपले परखड मत व्यक्त केले.
          कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजेंद्र कंटक यांनी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची आजची शोकांतिका सांगत शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आवश्यक भूमिका पार पाडत असतात.त्याचबरोबर ज्ञानाबरोबर संस्कार करत असतात विद्यार्थी दशेमध्ये शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेमुळेच आज मी यशस्वी झालो असे मत व्यक्त करीत त्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.तसेच शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांचे महत्त्व सूर्याप्रमाणे नेहमीच तळपत राहील असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
       कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.अजित थोरात यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती समारंभ अर्थात शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्व शिक्षक शिक्षिका बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व अखंडपणे अशा स्वरूपाच्या कार्यक्रमासाठी पुढाकार घेऊन शिक्षकांचे काम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सदैव करत राहू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
          यावेळी शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापिका प्रतीक्षा पवार, सहाय्यक शिक्षिका भाग्यश्री सिंदूर, सहाय्यक शिक्षक श्री.राहुल माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
      तसेच मारुती सुझुकीच्या अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्व शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व यावेळी मारुती सुझुकी च्या वतीने नवीन वाहनांचे लॉन्चिंग प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी शिक्षकांसाठी खास सवलत त्यांनी मनोगतातून जाहीर केली.
      यावेळी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा मधील शिक्षकवृंद तसेच मलकापूर, कराड पंचक्रोशीतील शिक्षक, शिक्षिका, आजी-माजी शिक्षक, शिक्षिका यांची उपस्थिती होती. श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था यांचे वतीने शिक्षक दिनाच्या औचित्य साधून शिक्षकांच्या कार्याचा गुणगौरव म्हणून सर्व उपस्थित शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला व शिक्षकांविषयी त्यातून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
        संगीत शिक्षक मा. शरद तांबवेकर सर त्यांच्या वाद्यवृंद विभागाने मन की विणा से गुंजीत ध्वनी मंगलम,स्वागतम स्वागतम हे स्वागत गीत व भेटला विठ्ठल अशी गीते सादर उपस्थित सर्वाना मंत्रमुग्ध केले.
        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखातील शाखाप्रमुख त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ. शीला पाटील, प्रा. सौ. सुरेखा खंडागळे यांनी केले तर आभार श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माजी व्हाईस चेअरमन अरुणादेवी पाटील यांनी केले.
      श्री मळाईदेवी शिक्षण संस्था व श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा शिक्षक दिनाचा कार्यक्रम व त्या अनुषंगाने शिक्षक बांधवांचा केला जाणारा यथोचित सत्कार यामुळे शिक्षकवर्गातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

शनिवार, २३ ऑगस्ट, २०२५

भव्य मलकापूर रोडरेस स्पर्धा २०२५


भव्य मलकापूर रोडरेस स्पर्धा २०२५ मलकापूर येथे क्रीडामय वातावरणात संपन्न...
        स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त  प्रतिसाद...
मलकापूर-
           श्री मळाईदेवी  शिक्षण संस्था लायन्स क्लब कराड सिटी व आदर्श क्रीडा संस्था कराड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मलकापूर रोड स्पर्धा शनिवार दिनांक २३ऑगस्ट २०२५ रोजी मलकापूर येथे क्रीडामय वातावरणात संपन्न झाल्या. यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे चेअरमन श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था मा. अजितकाका थोरात, लायन्स क्लब अध्यक्ष मा. लायन शशिकांत पाटील यांच्या शुभहस्ते व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ, लायन क्लब लायन्स क्लब कराड सिटी सचिव लायन मा. अनिल पाटील, खजिनदार लायन  मा.ॲड. दिग्विजय पाटील,एमजेफ कॅबिनेट ऑफिसर लायन डॉ.महेश खुस्पे, एमजेएफ झोन चेअरमन लायन मा.मंजिरी खुस्पे, कॅबिनेट युथ लायन मा. विद्या मोरे,एमजेफ मा. सुशांत वाव्हळ,मा.सौ.मीनल पाटील संचालक श्री,मळाईदेवी शिक्षण संस्था मा.प्रा.संजय थोरात मा.वसंतराव चव्हाण,उद्योजक मा. मुदस्सर मोमीन,लायन पियुष गोर,लायन मा.दिलीप जगताप, लायन मा. सुनिता पाटील,लायन मा.मनीषा भोसले, लायन मा. कांचन सोळवंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
         यावेळी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव शेतीमित्र मा.अशोकराव थोरात यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा देत  स्पर्धेत यश अपयश येत असते. पण खेळ हा जीवनाचा अविभाज्य घटक असला पाहिजे.आपण सातत्याने खेळाला वेळ देऊन आपली शारीरिक तंदुरुस्ती टिकवली पाहिजे तसेच ध्येय चिकाटी व सातत्य ठेवून खेळामध्ये अव्व्ल स्थान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत यावेळी व्यक्त केले.तसेच लायन्स क्लब कराड सिटीचे अध्यक्ष लायन मा. शशिकांत पाटील यांनी या स्पर्धेचे निमित्ताने खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले याबद्दल त्याचे व त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे कौतुक केले व अशा सर्व उपक्रमांना श्री मळा ईदेवी शिक्षण संस्था व मळा ई ग्रुप मधील सर्व संस्थांची नेहमी साथ राहील असे आश्वासन यावेळी दिले.
         यावेळी  लायन्स क्लब कराड सिटीचे अध्यक्ष लायन मा. शशिकांत पाटील यांनी लायन्स च्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देत खेळाडूंसाठी आदर्श क्रीडा संस्थेच्या माध्यमातून श्री मळाईदेवी शिक्षण संस्था करत असलेल्या प्रयत्नाबद्दल संस्थेचे कौतुक करीत खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने करावे व यातूनच चांगले खेळाडू तयार होतील जे भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या स्पर्धेमध्ये चमकतील असा आशावाद व्यक्त केला.तसेच यापुढेही लायन्स क्लब कराड सिटी व श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने संयुक्तरित्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून  खेळाडूंना  चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल तेव्हा भविष्यात खेळाडूंनी या संस्थांच्या उपक्रमामध्ये भाग घेऊन आपले कौशल्य सिद्ध करावे असे मत यावेळी व्यक्त केले. सदर स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजेत्या खेळाडूंना लायन्स क्लब कराड सिटीच्या सर्व पदाधिकारीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
       यावेळी श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या  कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे,आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या सौ.अरुणा कुंभार,आदर्श ज्युनिअर कॉलेजच्या विभागप्रमुख सौ. शीला पाटील, मुख्याध्यापिका सौ.ज्योती शिंदे,स्टार इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. लता जाधव तसेच  क्रीडाप्रेमी पालक, पत्रकार व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
           यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांक विजेत्या  खेळाडूंचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,लायन्स क्लब कराड सिटी व आदर्श क्रीडा संस्थेचे सर्व पदाधिकारी  यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.  यावेळी सर्व विजेत्या खेळाडूंना आकर्षक ट्रॉफी, मेडल्स, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित सर्व खेळाडू व सहभागी खेळाडू या तिन्ही संस्थांच्या वतीने व उद्योजक मुद्दस्सर मोमीन यांचे वतीने खाऊ चे वाटप करण्यात आले.स्पर्धेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
      यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षिका सौ. सविता पाटील यांनी केले तर आभार क्रीडा शिक्षक श्री.योगेश खराडे यांनी मानले.
         तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आदर्श क्रीडा संस्थेचे सचिव श्री.जगन्नाथ कराळे, उपाध्यक्ष श्री. जयवंत पाटील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व लायन्स क्लब कराड सिटी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

 *भव्य मलकापूर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे  ----* 
 *वयोगट ६वर्ष मुले-(५०० मी धावणे)*
 रुद्राश रमेश येडगे (प्रथम)
 आयुष्य दीपक टोकले (द्वितीय) स्वराज विक्रम हेडगे (तृतीय )
श्रीराज महेंद्र पाटील (चतुर्थ )
आयुष अक्षय चव्हाण( पंचम)
 *वयोगट ६ वर्ष मुली( ५०० मीटर)*
 इशिता गणेश येडगे (प्रथम) 
धनुष शंतनू पाटील( द्वितीय)
 वैदयी वैभव देवकर (तृतीय) राजप्रिया वैभव पुजारी (चतुर्थ )
मनस्वी अक्षय डाळे ( पंचम)
 *वयोगट ८ वर्ष मुले (१ कि.मी)-* 
आदर्श शशिकांत येडगे( प्रथम) रविराज राजेश शिंदे ( द्वितीय) हर्षवर्धन विक्रम पवार (तृतीय)
 अनुज बापूराव येडगे (चतुर्थ)
 विराज माणिक पाटील व प्रणिल सुहास नारकर ( पंचम)
 *वयोगट ८ वर्ष मुली (१ कि.मी)* 
सिद्धी अविनाश खबाले( प्रथम) 
 रिद्धी अविनाश खबाले (द्वितीय) प्रांजल सचिन येडगे (तृतीय) राजनंदिनी वैभव पुजारी (चतुर्थ) शिवांजली रामदास शिंदे (पंचम)
  *वयोगट१०वर्ष मुले(२कि.मी)* 
 आर्य विजय थोरात( प्रथम)
 सार्थक महेश काशीद( द्वितीय )
इंद्रसेन मयूर पाटील (तृतीय)
 समर्थ  कुमार पाटील (चतुर्थ)
 यश सुधीर मोरे (पंचम)
   *वयोगट १० वर्ष मुली (१ कि.मी )* 
 ईश्वरी मकरंद मुळे( प्रथम )
आराध्या अनिल गरुड( द्वितीय) आदिती अशोक घारे (तृतीय)
 सिद्धी विजय घाडगे (चतुर्थ)
 शिवन्या सचिन कांबळे( पंचम)
 *वयोगट १२वर्षे मुले (२. ५कि.मी.)*
 समर्थ धनंजय सुर्वे (प्रथम)
 कैवल्य अमित उमरजकर( द्वितीय) जयंत तानाजी पाटील (तृतीय) यशराज संदीप कांबळे( चतुर्थ )
आर्यन संदीप माने (पंचम)
 *वयोगट १२वर्ष मुली (२कि.मी )* 
ईश्वरी लक्ष्मण गरुड (प्रथम )
स्वराली विनोद पाटील (द्वितीय) कणक  मिलिंदकुमार शिंदे (तृतीय) भूमि हरिदास माने (चतुर्थ)
त्रिशा संदीप शिर्के (पंचम) 
  *वयोगट १४वर्ष मुले (३ कि.मी)* श्रवण उदय साळुंखे (प्रथम)
राज दिपक यादव (द्वितीय) 
शंभू रघुनाथ येडगे( तृतीय )
श्रीकृष्ण दिलीप तगारे (चतुर्थ) सत्यजित सचिन गायकवाड (पंचम)
 *वयोगट १४ वर्षे मुली(२.५ कि.मी)* 
 अबोली नंदकुमार वास्के (प्रथम) आराध्या माणिक वास्के (द्वितीय) श्रेया संजय गोंडाळ (तृतीय) 
अनुश्री संग्राम काळे( चतुर्थ )
जान्हवी राजेंद्र पाटील (पंचम)

आता परत चौथी व सातवीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा होणार.... वाचा सविस्तर 👇👇

Scholarship Exam 2025 Changes: परीक्षा वेळापत्रक आणि आयोजन (Revised Exam Schedule & Implementation) 🕒 २०२५-२६ मध्ये विशेष बाब: इ.५ वी व...