शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०२५

आता परत चौथी व सातवीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा होणार.... वाचा सविस्तर 👇👇

Scholarship Exam 2025 Changes: परीक्षा वेळापत्रक आणि आयोजन (Revised Exam Schedule & Implementation)
🕒 २०२५-२६ मध्ये विशेष बाब:
इ.५ वी व ८ वी परीक्षा: फेब्रुवारी २०२६ च्या २ऱ्या किंवा ३ऱ्या रविवारी
इ.४ थी व ७ वी परीक्षा: एप्रिल किंवा मे २०२६ मधील कोणताही रविवार
📅 २०२६-२७ पासून नियमित परीक्षा:
दरवर्षी फेब्रुवारीच्या २ऱ्या/३ऱ्या रविवारी परीक्षा घेण्यात येईल.
📍 आयोजक संस्था: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
💰 3. वाढलेली शिष्यवृत्ती रक्कम आणि कालावधी (Increased Scholarship Amount & Duration)
💸 रक्कम:
इ.४ थी स्तर: ₹500/महिना (₹5000/वर्ष)
इ.७ वी स्तर: ₹750/महिना (₹7500/वर्ष)
कालावधी: ३ वर्षे
🏦 वितरण: विद्यार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यातून थेट जमा.
📊 मंजूर संच संख्या:
इ.४ थी / ५ वी: १६,६९३
इ.७ वी / ८ वी: १६,५८८
🧾 4. पात्रता निकष (Eligibility Criteria)
✅ निवास: महाराष्ट्रातील रहिवासी
✅ शिक्षण: शासनमान्य शाळेत इ.४ थी किंवा ७ वी शिकत असलेला विद्यार्थी
वयमर्यादा (१ जून रोजी):
इ.४ थी: १० वर्षे (दिव्यांग: १४ वर्षे)
इ.७ वी: १३ वर्षे (दिव्यांग: १७ वर्षे)
किमान गुण: प्रत्येक पेपरमध्ये ४०% गुण आवश्यक.

📚 5. परीक्षा स्वरूप आणि अभ्यासक्रम (Exam Format & Syllabus)
🗒️ माध्यमे: मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलुगू
📖 अभ्यासक्रम:
इ.४ थी स्तर – इ.१ ली ते ४ थी
इ.७ वी स्तर – इ.१ ली ते ७ वी
🧠 प्रश्न स्वरूप: वस्तुनिष्ठ (MCQ), ४ पर्यायांपैकी १ योग्य
🎯 काठिण्य पातळी: कठीण (३०%), मध्यम (४०%), सोपे (३०%)
✏️ पेपर रचना:
पेपर १: प्रथम भाषा (५० गुण) + गणित (१०० गुण)
पेपर २: तृतीय भाषा (५० गुण) + बुद्धिमत्ता चाचणी (१०० गुण)

 संकलन - श्री रफिक सुतार सर 
 आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर 

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५

आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर च्या वेबसाईट चे उदघाटन

*आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगरच्या शाळा वेबसाईटचे उद्घाटन उत्साहात संपन्न* 
*डिजिटल युगात वेबसाईट हीच यशाची गुरुकिल्ली -डॉ.सौ.स्वाती थोरात* 
   श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श प्राथमिक विद्यालय व शिशु विहार आगाशिवनगर च्या शाळा वेबसाईट चे उद्घाटन संस्थेच्या संचालिका- डॉ.सौ. स्वाती थोरात यांच्या शुभहस्ते ,पालक प्रतिनिधी.श्री श्रीकांत नरूले, श्री अतुल काकडे ,श्री.तानाजी शिंदे,श्री.निखिल केसकर,श्री विजय हजारे ,श्री संदीप गायकवाड ,श्री.सचिन मोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक- सचिन शिंदे ,श्रीमती लता नलवडे, शिक्षकवृंद व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न.
      सध्याच्या संगणकयुगात शैक्षणिक प्रगती व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीसाठी डिजिटल युगात वेबसाईट हीच यशाची गुरुकिल्ली आहे .असे मत संस्थेच्या संचालिका- डॉ.सौ.स्वाती थोरात मॅडम यांनी व्यक्त केले.
       विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे ,आनंददायी शिक्षणाचे आदर्श संस्कार मंदिर अशी ख्याती असणारे आदर्श ज्ञानसंकुलन आता एका क्लिक वरती उपलब्ध होत असून संस्थेचे सचिव- मा.अशोकराव थोरात (भाऊ) यांच्या मार्गदर्शनाखाली वेबसाईटच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली संधी. ही नक्कीच नवनवीन शैक्षणिक क्षितिजे पादाक्रांत करण्यास सहाय्यभूत ठरेल. असा विश्वास विद्यालयाचे मुख्याध्यापक- श्री सचिन शिंदे यांनी व्यक्त केला.
       यावेळी सौ.अर्पिता बाबर सौ.स्वप्नाली भिलारे, सौ.शुभांगी तोडकर,सौ.साक्षी मोरे,सौ. दिपाली तांबे, सौ. ऐश्वर्या शेवाळे सौ.विशाखा पवार ,सौ.दिपाली खबाले, सौ.रविना कुंभार ,सौ. स्वाती हावळ,सौ.रुपाली चौगुले,सौ जोत्स्ना जगदाळे, सौ.प्रियांका देशमुख,सौ.सविता भाष्टे, सौ.अनिता कुंभार आधी पालक व विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोपान जगताप यांनी केले.तर आभार श्री.रफिक सुतार यांनी मानले.

@आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर मध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा@

*@ १५ ऑक्टोबर @*
*वाचन प्रेरणा दिन*

१५ आॕक्टोबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते. आदरणीय कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत. पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आपण 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करीत आहोत. आपण शैक्षणिक जीवनात सतत पुस्तकांच्या सान्निध्यात राहूनही अंतिमत: अवांतर वाचनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे म्हटले जाते. वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.

'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे. वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.

हा संस्कार जितक्या लहान वयापासून केला जाईल तितके आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ बनत जाते. कारण या वाचनामुळे लहान मुलांमधील आकलन क्षमता वाढते. गोष्टींच्या पुस्तकातील कोणत्याही कथेला सुरवात, मध्य आणि शेवट असतोच. कथेच्या या रचनेमुळे लहान मुलांच्या मेंदूला चालना मिळते. ते विचार करायला सुरवात करतात, कारणांशी संबंध जोडतात, तार्किक विचार करीत मनातल्या मनात कथेचा शेवटही योजून ठेवतात. एखादी गोष्ट अवगत करणे ही लहान मुलांमधील सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदूची जडणघडण होते. वाचनाने विचार क्षमता वाढीस लागण्याचे हे मूळ कारण आहे. वाचन आपल्या मेंदूसाठी व्यायामाचे काम करते. विद्यार्थ्यांवर शालेय जीवनात 'वाचन संस्कार' व्हावेत, यांच्या ठायी समृद्ध अशी अभिरुची, उच्च दर्जाची रसिकता आणि संवेदनशीलता हे मूल्य रूजविण्याच्या हेतूने या 'वाचन प्रेरणा दिनाचे' महत्व आणखीनच वाढते. म्हणूनच विद्यार्थ्यां मध्ये शालेय जीवनापासूनच वाचनाची गोडी निर्माण करणारे उपक्रम राबवले गेले पाहिजेत.

महत्वाचे म्हणजे वाचनाच्या वेगाची संकल्पना प्रत्येकाला असायली हवी. एका नजरेच्या टप्प्यात पुस्तकाचा जास्तीत जास्त भाग यायला हवा, तसा सरावही हवा. भारतीय लोकांचा सरासरी वाचनाचा वेग हा जपानी लोकांच्या सरासरी वाचनाच्या वेगापेक्षा खूपच कमी आहे हे खेदाने का होईना, आम्ही कबूल करतो. कमी कालावधीत जास्तीत जास्त आकलनासह वाचन हे खरे वाचन कौशल्य. नुसता एकच दिवस 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करुन थांबण्यापेक्षा, रोजच जर पुढील उपक्रमांद्वारे वाचन प्रेरणा राबविली तर वाचन प्रेरणा दिनाचे रुपांतरण वाचन चळवळीत होईल, यांत शंका नाही. या साठी केवळ शाळेतच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, घर परिसर, घर या पातळ्यांवर वाचनालय, पुस्तक पेढी, पुस्तक भेट योजना, पुस्तक दान योजना, वाचन प्रेरणा विषयक व्याख्याने यांचे वेळोवेळी वा कायमचे आयोजन/नियोजन आवश्यक आहे. या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य लक्षात घेवून आम्हाला आज वाचन या क्रियेसंदर्भात आणखी वेगळे काही सांगावयाचे आहे. 'वाचन' हा शब्द आला की, आपण फक्त 'पुस्तकी वाचन' एवढाच मर्यादित अर्थ घेतो. आमच्या मते वाचनाचा अर्थ इतका सिमित नाही. आपली पंचेद्रिये आणि मन ही खरी वाचनाची माध्यमे आहेत, त्यांचा वापर करता यायला हवा. डोळ्यांना जे जे दिसतं ते ते वाचता यायला हवं. मग वस्तु दिसो वा व्यक्ती किंवा घडणारा प्रसंग असो, डोळ्यांनी वाचायला हवं.

नाकाला जाणवणारा गंध वाचता यायला हवा!
कानांनी आवाज वाचता यावा असा सराव हवा!
त्वचेलाही होणारा प्रत्येक स्पर्श वाचता यायला हवा! 
स्पर्शवाचनातून स्पर्शाचा अर्थ कळायला हवा!
निदान वेळेवर सावध तरी होता येते!
जीभेलाही चव वाचता यायला हवी!
पंचेद्रियांच्या वाचनासाठी मनात संवेदना जागृत व्हायलाच हवी. आणि सर्वांत महत्वाचे की, आपल्याला आपल्या मनाद्वारे दुसऱ्यांचे (किमान आपल्या घरातल्या व्यक्तींचे अथवा मित्र मैत्रीणींचे तरी) मन वाचता यायला हवे. दुसऱ्यांचे मन वाचता येणे हे उच्च कोटीच्या संवेदन शीलतेचे लक्षण आहे. अशा संवेदनशीलतेनेच मानवता जागृत होते हे ही लक्षात घ्यायलाच हवे. थोडक्यात काय, तर आपल्या सर्वच संवेदनांचे परिपूर्ण वाचन प्रत्येकाला करता येणे आवश्यकच आहे.

*वाचाल तरच वाचाल*
'वाचाल तर वाचाल' हे ब्रीद मानू या धन,
वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन;
वाचाव्यात संवेदनाही, या जागृत पंचेद्रियांनी,
पुस्तकाच्या वाचनासवे, करावे मनाचे वाचन !
प्रत्येक विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व सुंदर, संवेदनशील, रसिक व कलावंत होण्यासाठी प्रत्येक शाळेने वाचन प्रेरणेचे कार्यक्रम घेऊन येणारी पिढी समृद्ध व्यक्तिमत्त्वाची घडवावी हेच 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करतांना अपेक्षित आहे. पुस्तकी वाचनासोबत आपण एखाद्याच्या 'मनाचे' ही वाचन करावे ही सर्वांना नम्र विनंती करुन, आम्ही आपला निरोप घेतो.

संकलन :- श्री रफिक सुतार 
आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर

आता परत चौथी व सातवीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा होणार.... वाचा सविस्तर 👇👇

Scholarship Exam 2025 Changes: परीक्षा वेळापत्रक आणि आयोजन (Revised Exam Schedule & Implementation) 🕒 २०२५-२६ मध्ये विशेष बाब: इ.५ वी व...